मालवण, दि.१३ मार्च
तोंडवळी तळाशील येथे कालावल खाडी पात्रातील वाळू उत्खनन विरोधात तेथील महिलांनी दि. २६ जानेवारी रोजी खाडी पात्रात उतरून उपोषण आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तळाशील तोंडवळी गावची पाहणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिना होऊनही तळाशील तोंडवळी गावाला भेट न दिल्याने याप्रश्नी पुन्हा एकदा खाडी पात्रात उपोषण करण्यात येईल, असा इशारा तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तळाशील तोंडवळी येथे कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे गावच्या भूभागाची धूप होत आहे. या वाळू उत्खननावर कारवाई होत नसल्याने तोंडवळी तळाशील मधील महिलांनी या वाळू उत्खनना विरोधात प्रजासत्ताक दिनी खाडी पात्रातील पाण्यात उतरून उपोषण आंदोलन छेडले होते. या उपोषणा नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तळाशील येथील महिला व ग्रामस्थ यांच्या समवेत बैठक घेतली होती. या बैठकीत वाळू उत्खननामुळे गावाची झालेली धूप भरून काढणे, किनाऱ्यावर भराव टाकणे व नंतर त्याठिकाणी बंधारा बांधणे या मागण्यांसाठी दोन ते तीन दिवसात संबंधित अधिकाऱ्यां समवेत गावाला भेट देऊन पाहणी करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थाना दिले होते. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, महिना उलटला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी तळाशील तोंडवळी गावाला भेट दिलेली नाही तसेच अधिकाऱ्यां मार्फत ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना कोणताही संदेश व निरोप देण्याची तसदी घेतलेली नाही, असे जयहरी कोचरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्थगित केलेले उपोषण पुन्हा पूर्व सूचना न देता आम्ही सुरु करणार आहोत, असा इशारा जयहरी कोचरेकर यांनी दिला आहे.