तिलारी मुख्य वसाहत येथे झाडावरून पडून एका ३५ वर्षीय होमगार्डचा मृत्यु

दोडामार्ग, दि. १३ मार्च 
तिलारी मुख्य वसाहत येथे झाडावरून पडून एका ३५ वर्षीय होमगार्डचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी २:३० वा.च्या सुमारास घडली. बाळकृष्ण विश्वनाथ जाधव रा. साटेली-भेडशी, विमानतवाडी असे मयत होमगार्डचे नाव आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र मित्रपरिवार, सहकारी होमगार्ड यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
साटेली-भेडशी बाजारपेठेतच कायम होमगार्ड म्हणून काम पाहत असत. त्यामुळे प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. सध्या दहावीची परिक्षा सुरू असल्याने न्यु इंग्लिश स्कुल भेडशी येथे परीक्षा केंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत होते. बुधवारी दुपारी सेवा बजावल्यानंतर ते दुपारी आपल्या घरी गेले. जेवण करून ते तिलारीला गेले. तेथे दुपारी ते झाडावरून पडले. लागलीच त्यांना साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे घोषित केली. त्यांच्या निधनाची वार्ता तालुक्यात पसरताच त्यांच्या मित्रपरिवाराने आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. बाळकृष्ण जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यात होमगार्ड म्हणून सेवा बजावत होते. प्रामाणिकपणे ते होमगार्ड म्हणून काम करीत असत. बरीच सेवा ही साटेली-भेडशी बाजारपेठेत असायची. यामुळे बऱ्याच लोकांशी त्यांचा संपर्क असायचा. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरक्षा व नियंत्रण राखण्यासाठी नेहमीच कार्यरत असत. कोरोना कालावधीत सुद्धा त्यांनी चांगली सेवा बजावली होती. त्याचबरोबर दोडामार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अनेक पोलिस सहकाऱ्यांना या दुःखद घटनेने अश्रु अनावर झाले. अनेक जुने नवीन पोलिस, होमगार्ड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल झाले. त्यांच्या या अकाली निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.