सावंतवाडी,दि.१८ एप्रिल
सध्या राज्यात उपस्थित झालेल्या हिंदुत्वाचा मुद्दा हे भाजपचेच षडयंत्र असून वाढलेल्या महागाई बाबत जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव शेखर माने यांनी आज येथे केली.
तर राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेली ती भुमिका नव्हे तर नाटक आहे, त्याच्याकडे जनतेने करमणुक म्हणूनच पाहावे असे त्यांनी यावेळी सांगितले
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज तेथे प्रदेश सचिव श्री माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्या सोबत व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख अर्चना घारे, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, काका कुडाळकर ,भास्कर परब, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक,अनंत पिळणकर, आदी उपस्थित होते.
श्री माने पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा संपूर्ण राज्यभर सुरू आहेत याची सांगता २३ एप्रिल रोजी कोल्हापूर या ठिकाणी होत असल्याने या संदर्भात आढावा व पक्ष संघटनेशी चर्चा करण्यासाठी अशा ठिकाणी बैठक पार पडली हॅपी बर्थडे विविध त्यावर चर्चा झाली, यामध्ये प्रकर्षाने जिल्ह्यातील शिवसेना या मित्र पक्षाकडून विकास कामात राष्ट्रवादी पक्षाला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली मुळात सरकार स्थापनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची असून राज्यात तिन्ही पक्षाकडून एकत्ररित्या काम केले जात आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसे होत नसल्यास लवकरच तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक आयोजित करण्यात येईल व यातून तोडगा काढला जाईल. शिवाय तेवीस तारखेला होणाऱ्या कोल्हापूर येथील मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास सात हजारांहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तर राज्यभरातून पाच लाखाहून कार्यकर्ते उपस्थित असणार आहे.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा कष्टाळू आहे या ठिकाणी म्हणावा तसा पक्ष उभारी घेत नसला तरी भविष्यात पक्ष निश्चितच ताकदवान असेल त्यासाठी राज्य पातळीवरुन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. आज राज्यभर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे राज ठाकरे कडून मशिदीवरील भोंगे याबाबत आवाज उठवण्यात आला मात्र यामागे भाजप षडयंत्र असून गेल्या दोन वर्षापासून सरकार अस्थिर करण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे जनतेतून रोष व्यक्त होत असताना जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यानी हा मुद्दा उचलला आहे. राज ठाकरेंची भूमिका ही आज एक तर उद्या दुसरी अशी नेहमीच बदलत असते त्यामुळे त्यांनी आत्ता घेतलेली भूमिका नव्हे तर ते एक नाटक आहे त्याकडे जनतेने करमणूक म्हणूनच पाहावे.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या मालवण येथील आत्मनिर्भर सेल जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांनी श्री माने यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्री नाबर यांना आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.