‘काळाबरोबर जगणे बदलते जगण्याबरोबर कलेचे संकेत बदलतात’- कवी अजय कांडर

‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न

देवगड, दि.५ ऑगस्ट 

देवगड महाविद्यालय आणि शेठ म. ग.हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन गुरुदक्षिणा सभागृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रसिद्ध कवी आणि लेखक अजय कांडर, प्रसिद्ध मालवणी कवी श्रिजारिओ पिंटो आणि कवयित्री आणि लेखिका ॲड.अपर्णा परांजपे – प्रभू परीक्षक म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अजय कांडर यांनी स्पर्धकांना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. ‘कविता करणे ही एक कला आहे. काळाच्या ओघात आपले जगणे बदलते आणि जगण्याबरोबरच कलेचे संकेत बदलतात. म्हणूनच कवीने नेहमी त्या बदलत्या संकेत व्यवस्थेला विचारात घेऊन आपल्या काव्य निर्मितीत प्रयोग केले पाहिजेत. कविता एकदा लिहिली म्हणजे झाले नाही तर, तिच्यावर वेळोवेळी संस्कार केले पाहिजे, एखादी कविता आम्ही आठ – नऊ वेळा देखील लिहितो तेव्हा कुठे ती वाचनीय होते. त्यामुळे तुमच्यातील अनेकांनी कविता एकदाच केली आणि थांबले असे केले आहे. तसे न करता तुमच्या कवितेवर शब्दांचे संस्कार करा म्हणजे ती अधिक वास्तव आणि वाचनीय होईल.’आपल्या अनेक कवितांचे दाखले देऊन त्यांनी स्पर्धकांना पुढील काव्य लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
रिजारिओ पिंटो यांनी आपल्या मालवणी कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. तर ॲड.अपर्णा परांजपे-प्रभू यांनी कवितेच्या लेखनातील बारकावे थोडक्यात सांगून आपल्या कवितांचे सादरीकरण देखील केले.प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठवर शेठ म.ग.हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीव राऊत उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील एकूण ९० स्पर्धकांचा सहभाग दर्शविला.
या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे – शालेय गट – प्रथम क्रमांक – कु. गौरव परब (कणकवली), द्वितीय – कु.निलेश पराडकर (देवगड) तृतीय – कु.माही साटम (देवगड). महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक मालिनी लाड (कणकवली) , द्वितीय क्रमांक गुणाली घाडी (देवगड), तृतीय क्रमांक. सुचिता मांजरेकर (देवगड) खुला गट प्रथम क्रमांक श्री.श्रेयस शिंदे(कणकवली),व्दितीय क्रमांक- सौ.विद्या मोरे (कुडाळ), तृतीय क्रमांक सौ.जान्हवी लोक (देवगड) आणि श्री. अशोक आठलेकर( मालवण) यांना विभागून देण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कविवर्य वसंत बापट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या आयोजनात देवगड महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ.सुनेत्रा ढेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.सौ.हेमश्री चिटणीस यांनी केले होते. त्यांना प्रा.आर. व्ही.तेली, प्रा.पी.के. अणावकर, प्रा.एच.के.राणे, प्रा.एस.एस. तारी,प्रा. एम्.एस.तेली त्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शिक्षण विकास मंडळ, देवगडचे संस्था पदाधिकारी चंद्रहास मर्गज, तुकाराम तेली आणि सुधीर साटम यांची उपस्थिती लाभली. कु.श्रावणी मराठे हिच्या वसंत बापट आणि शांता शेळके यांच्या गीतावरील नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. तसेच शेठ म. ग.हायस्कूल आणि देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर समूह गीते सादर केली. प्रा.हेमश्री चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा