उत्तर प्रदेशातून अल्पवयीन युवती पळवणाऱ्या आरोपीला अटक..

कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी; आरोपीसह युवतीला आणले कणकवलीत..

कणकवली दि.५ ऑगस्ट(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील एका गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीला फूस लावत लग्नाच्या अमिष दाखवत संशयित आरोपी नूरुल मकसूद खान (राहणार- सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याने १ ऑगस्टला पळवले होते.नातेवाईकांनी २ ऑगस्टला पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासात उत्तर प्रदेश रेल्वे पोलीस व कणकवली पोलीस असे एकत्रित कोबिंग ऑपरेशन करत लखनऊ रेल्वे स्थानकात त्या अल्पवयीन युवतीसह आरोपीला ताब्यात घेतले. त्या दोघांनाही आज कणकवलीत आणले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कणकवली तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन युवतीची गेल्या सहा महिन्यांत सेन्ट्रीग काम करत असताना संशयित आरोपी नूरुल खान याने ओळख केली होती. ओळखीने आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्या अल्पवयीन युवतीला १ ऑगस्टला घेऊन नालासोपारा मुंबई गाठली होती. त्या ठिकाणी आरोपीचे आई-वडील राहतात,तिथे न थांबता २ ऑगस्टला त्या आरोपीने मुंबई येथून उत्तर प्रदेश लखनऊ येथे जाण्यासाठी बांद्रा रेल्वे स्थानक येथून रेल्वे पकडली होती.पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी लोकेशन काढत काही मुबंई येथील पोलीस मित्रांची मदत घेतली.

कणकवली पोलीस ठाण्यात त्या अल्पवयीन युवतीच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल करतात संबंधित युवतीचे लोकेशन काढण्यात आले. रेल्वेने उत्तर प्रदेश येथे आरोपी निघाल्याची माहिती पोलिसांनी काढत संबंधित रेल्वे गाडीचा तपशील उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आला. संबंधित युवतीच्या अंगावर कोणता ड्रेस आहे व त्याबाबत काही महत्त्वाचे पुरावे रेल्वे पोलिसांना पाठवण्यात आले. त्यानुसार लखनऊ रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात उतरताच संशयित आरोपीसह त्या अल्पवयीन युवतीला ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. या सगळ्या ऑपरेशन मध्ये कणकवली पोलीस व उत्तर प्रदेश रेल्वे पोलीस यांनी एकत्रित कोंबिंग ऑपरेशन राबवले होते.

संबंधित आरोपी रेल्वेने निघाल्याचे समजल्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. तेथून कणकवली पोलिसांनी थेट विमानाने उत्तर प्रदेश गाठत संबंधित अल्पवयीन युवती व आरोपीला ताब्यात घेतले .त्या दोघांनाही आज कणकवलीत आणण्यात आलेले असून संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.उद्या त्या आरोपीला कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल आढळ यांनी दिली .ही मोहीम फत्ते करण्यासाठी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे,महिला पोलीस भागवत सहभागी होत्या. या कारवाई बद्दल कणकवली पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा