बिबट्याच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

कणकवली दि.५ ऑगस्ट(भगवान लोके)

बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाने सापळा रचून तळेरे येथे श्रावण लक्ष्मण माणगावकर, (३७,रा. तळेबाजार) ,राजेंद्र पंढरीनाथ पारकर (वय-६०,रा. वळीवंडे) या दोन संशयिताना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी अंती पोलिसांनी त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून जिल्ह्यात तळेरे येथे बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती . या माहितीची खातरजमा करून कारवाईचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदाराच्या पथकाने तळेरे येथे सापळा रचून दोघांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची तपासणी केली. यावेळी एका वाहनामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले. त्यामुळे दोघांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या विविध कलमाप्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
त्या संशयितांकडून ३ लाख ५० हजारांचे बिबट्याचे कातडे व ८ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी कार असा सुमारे ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा