बोर्डवे येथे रेल्वे रुळाच्या बाजुला आढळला युवतीचा मृतदेह..

तेर्से बांबार्डे येथील वैजयंती सावंत या युवतीचा मृतदेह..

कणकवली दि.५ ऑगस्ट(भगवान लोके)

बोर्डवे अपराजवाडी येथील रेल्वे ट्रॅकच्या बाजुला शुक्रवारी सकाळी वैजयंती दत्ताराम सावंत(वय-२५, रा. तेर्से : बांबार्डे ता. कुडाळ) या युवतीचा मृतदेह आढळून आला.

सदर युवती ३ ऑगस्ट रोजी दिवा:सावंतवाडी ट्रेन मधून वडिलांसोबत प्रवास करताना बेपत्ता झाली होती. त्याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात ‘ती’ नापत्ता झाल्याची तक्रार नोंद आहे. तिच्या मृत्युचे कारण समजु शकले नाही.

 

याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विपुल इश्वर म्हस्के यांनी पोलिसात फिर्याद दिली .त्यात स्टेशन ड्युटीवर असताना स्टेशन मास्तर श्रीमती मनस्वी तांबे यांनी फोन करून सदरच्या प्रेताची कल्पना दिली. त्या भागात रेल्वे रूळावर पेट्रोलिंग ला असणाऱ्या रेल्वे कर्मचारी डि.एस.तांबे यांना संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर घटनास्थळी जाऊन खात्री केल्याचे म्हटले आहे. वैजयंती दत्ताराम सावंत ही ३ ऑगस्ट रोजी दिवा:सावंतवाडी ट्रेनमधून वडिलांसोबत प्रवास करीत होती. सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास ट्रेन कणकवलीत दाखल झाली असता तिच्या वडिलांनी पाहिले तर वैजयंती ट्रेनमध्ये नव्हती. ती ट्रेनमधून कशी गायब झाली याचे उत्तर सापडले नाही.
बोर्डवे अपराजवाडी येथे रेल्वे रूळाच्या बाजुला सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाच्या वर्णनावरून सिंधुनगरी पोलीस ठाण्यात नापत्ता असलेल्या युवतीशी जुळले. मृतदेहाचा फोटो पाहिल्यावर त्याच तरूणीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. ‘त्या’ युवतीच्या वडिलांनी पोलिसांसोबत घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांनी त्यांच्या मुलीचा मृतदेह असल्याचे सांगितले. याबाबत कणकवली पोलिसात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा