डीजेच्या तालावर व गोविंदांच्या उत्साही वातावरणात दहीहंडी उत्साहात साजरी
बांदा, दि.२० ऑगस्ट
‘गोविंदा रे गोपाळा …’ , ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा..’ , ‘ लाल लाल पागोटा गुलाबी शेला … ‘ यासह अनेक हिंदी – मराठी गाण्यांवर दोन वर्षांनंतर ठेका धरत बांद्यात गोविदांमध्ये सळसळता उत्साह दिसून आला. डीजेच्या तालावर व गोविंदांच्या उत्साही वातावरणात शुक्रवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील दोन दहीहंड्या वाफोली माऊली मंडळाने तर एक दहीहंडी सिहंगर्जना गोविंदा पथकाने फोडली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष दहीहंडी साजरी करण्यात आली नव्हती. त्यामुळे यावर्षी दहीहंडीचा मोठा उत्साह शहरात दिसला. शहरात सर्वप्रथम बांदेश्वर मित्रमंडळाची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी सिहगर्जना कला क्रिडा मंडळ बांदा गाडगेवाडी, महापुरुष युवक मंडळ बांदा निमजगा व वाफोली येथील माऊली गोविंदा मंडळ यांच्यात चुरस पाहायला मिळालि. ही दहीहंडी वाफोली माऊली गोविंदा पथकाने फोडली. माऊली व सिहगर्जना मंडळाने ५ थर रचल्याने दोन्ही पथकांना विभागून पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर गांधींचौक मित्रमंडळाची दहीहंडी देखील माऊली गोविंदा पथकाने तब्बल सहा थर रचून फोडली. या मंडळाने सर्वाधिक २२ हजार रुपये पारितोषिक ठेवले होते.
कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्रात्सव मंडळाची दहीहंडी सिहगर्जना गोविंदा मंडळाने रात्री उशिरा फोडली. याठिकाणी तिन्ही गोविंदा पथकाने सहा थर रचल्याने विभागून पारितोषिक देण्यात आले.
