मालवण पंचायत समितीतर्फे पथनाट्याद्वारे कोरोना विषयक जनजागृती

मालवण-दि.१६ ऑक्टोबर

कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असताना मालवण पंचायत समितीने एक अभिनव उपक्रम राबवित ‘या कोरोनाला कोणी ना रोके…’ या प्रबोधनात्मक पथनाट्याची निर्मिती केली आहे. कोरोनापासून बचावासाठी प्रशासन “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवित आहे. या मोहिमेला सहकार्य करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन या पथनाट्याद्वारे करण्यात आले. युट्युब वरून प्रसारित झालेल्या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले आहे. सूत्रधार व संयोजन गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आहे. निर्मिती व्यवस्था उपसभापती सतीश परुळेकर व विस्तार अधिकारी श्याम चव्हाण यांनी पाहिली आहे. यात विनोद सातार्डेकर, गीतेश कोदे, स्वप्नील पाटणे, अजिता लोके, मंगेश गोसावी, साईप्रसाद सावंत, युगंधरा डिचवलकर, दीपाली धामापूरकर, कृष्णा उर्फ के. टी. पाताडे यांनी भूमिका साकारल्या आहेत. गीतलेखन-विनोद सातार्डेकर, हार्मोनियम, रंगभूषा, वेशभूषा-सुहास माळकर, तबला-सुधीर गोसावी आदींनी जबाबदारी सांभाळली आहे. पथनाट्याचे व्हिडिओ एडिटिंग जुबेर खान यांनी केले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत नगरपालिका व आरोग्य प्रशासनाचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. ताप, सर्दी, खोकला अशाप्रकारे लक्षणे असल्यास त्याची माहिती कर्मचाऱ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा