नीट परीक्षेत आशिष झांट्ये ७२० पैकी ७१० गुण पटकावून महाराष्ट्रात प्रथम

भारतात १९ वा क्रमांक पटकावत दैदीप्यमान यश प्राप्त, मालवणच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला 

 मालवण-दि.१७ ऑक्टोबर

नीट २०२० या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने ७२० पैकी ७१० गुण पटकावून महाराष्ट्रात प्रथम तर भारतात १९ वा क्रमांक पटकावत दैदीप्यमान असे यश प्राप्त केले आहे. दरम्यान या यशाबद्दल बोलताना आशिष याने आपल्याला रेडिओलॉजिस्ट किंवा नॉन क्लिनिकल रिसर्च इन मॉलेक्युलर बायोलॉजी मध्ये प्रवेश घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे

भारत सरकारच्या वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत मालवणच्या आशिष झांटये याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

आशिष झाट्ये याला वैद्यकीय कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्याची आई मालवण येथे स्त्रीरोगतज्ञ असून वडील जनरल फिजिशियन आहेत. आशिष याने दहावीची परीक्षा मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मधून दिली होती. त्यात १०० टक्के गुण मिळवीत आशिषने राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. तर कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये बारावीची परीक्षा देत बारावीत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. या दोन्ही परीक्षांसाठी त्याला इंग्रजी विषयासाठी भंडारी हायस्कुल मालवणचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजुरकर यांचे तर भूगोल साठी शिक्षक धुरी यांचे मार्गदर्शन लाभले होते.

नीट परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना आशिष म्हणाला, नीट परीक्षेसाठी आपण दोन वर्षे मेहनत घेतली. कॉलेज व खाजगी शिकवणीच्या रोजच्या दहा – बारा तासाच्या अभ्यासाबरोबरच चार- पाच स्वयं अध्ययन देखील करत होतो. या परीक्षेसाठी आपण गोवा येथील आकाश इन्स्टिट्यूटचा शिकवणी वर्ग लावला होता. राज्यात पहिला येईन ही अपेक्षा मी ठेवली नव्हती, पण देशात पहिल्या ५० मध्ये येईन ही अपेक्षा होती. असे आशिष याने सांगितले.
आपल्याला रेडिओलॉजिस्ट किंवा नॉन क्लिनिकल रिसर्च इन मॉलेक्युलर बायोलॉजी मध्ये प्रवेश घ्यायची इच्छा असून एआयआयएमएस दिल्ली किंवा केम हॉस्पिटल मध्ये दाखल व्हायचे आहे, अशी इच्छा आशिष याने व्यक्त केली. नीट परीक्षेत आशिष याने मिळविलेल्या यशाने मालवणच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. आशिष याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा