जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

स्पर्धाकांनी गूगल लिंक द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

तळेरे-दि.२१ नोव्हेंबर संजय खानविलकर 

तळेरे येथील डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान आणि श्रावणी कंप्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे आठवे वर्ष असुन २५ नोव्हेंबर पर्यन्त जास्तीत जास्त स्पर्धाकांनी गूगल लिंक द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीची ही स्पर्धा “बांधणी नव्या विचारांची, सांगड नवोन्मेषाची!” यावर अवलंबून असणार आहे.

कित्येक ठिकाणी दिवाळीनिमित्त उत्साहात किल्ले उभारणी केली जाते आणि छ. शिवाजी महाराज आणि छ. शंभू राजे या पिता-पुत्रांच्या पराक्रमांना उजाळा मिळतो. परंतु त्यांच्या त्या युक्ती आणि शक्तीचा वापर दैनंदिन जीवनासाठी केला तर? तर नक्कीच स्वराज्यात सुराज्य उभे राहील यात शंकाच नाही ! हिच संकल्पना घेऊन यावर्षीची किल्ले स्पर्धा होणार असल्याची माहिती श्रावणी कंप्युटरच्या सौ.श्रावणी मदभावे यांनी दिली.

किल्ले बांधणीसोबत नव्या विचारांची बांधणी झाली पाहिजे आणि त्याला नवोन्मेषाची सांगड मिळाली पाहिजे. गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करताना मोठे संकट उभे राहिले. अनेकांचे आयुष्य विस्कळीत होत वैयक्तिक पासून ते अगदी देशसीमेपल्याड अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यावर्षीच्या या किल्ले स्पर्धेचा दरवर्षीप्रमाणे तंबाखुमुक्ती हा तर विषय आहेच. त्यासोबत कोरोनाच्या संकटात आपल्या महाराजांच्या युक्तीने आणि छ. शंभू राजांच्या शक्तीने आपल्या स्वराज्याची उभारणी आपण कशी करता येईल हा मुद्दा अधोरेखित होणार आहे. दूरदृष्टी, दृढता, कल्पकता, जिद्द, चिकाटी, जिज्ञासा, मेहनत, सातत्य, चपळाई, साहस अशा साऱ्यांना एकवटून स्वावलंबी बनू अन उद्योजकतेची पायरी रचू हेही त्यामागे उद्दीष्ट्य असणार आहे.यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर असुन नाव नोंदणी https://forms.gle/yzGRcWWct8DY92dq8 या गूगल लिंकवर करावी. त्यांनतर पुढिल माहिती मिळू शकेल. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रु. 5008, व्दितीय संघाला रु. 3008, तृतीय संघाला रु. 2008 व उत्तेजनार्थ संघाला रु. 1008 तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र मिळेल. याबाबतची सविस्तर माहिती गुगल लिंकवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा