मसुरे येथील शिक्षण तज्ञ शंकर परब यांचे नुकतेच मुंबई येथे निधन

0
361

मसुरे -दि.२१ नोव्हेंबर
मुंबई कुर्ला येथील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई चे नेते, मसुरे गावठणवाडी, कट्टा वाडी येथील रहिवासी शिक्षण तज्ञ शंकर उर्फ अण्णा वसंत परब ७२ वर्षे यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. अण्णा परब यांच्या निधनामुळे मसुरे गावा वरती शोककळा पसरली आहे..
शंकर उर्फ अण्णा परब यांनी मुंबई कुर्ला तसेच मसुरे परिसरात शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांचे अनेक लेख शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध झाले होते. मुंबई येथे गोरगरिबांसाठी ते मोफत क्लास घेत होते. मुंबईतील अनेक सामाजिक मंडळांची अध्यक्षपदे त्यांनी यशस्वीरीत्या भूषविली होती. मुंबई कुर्ला येथील जनसेवा प्रतिष्ठानचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. राजकीय क्षेत्रात मंत्री नसीम खान यांचे निकटवर्ती व सल्लागार म्हणून ते कार्यरत होते .नसीम खान यांच्या प्रत्येक विजयात अण्णा परब यांचा मोठा हात होता.मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या विविध सभांना अण्णा परब स्पीकर म्हणून काम करत होते. लॉकडाउनच्या पिरेड मध्ये त्यांनी मुंबई व मसूरे गावामध्ये अनेक गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले होते. गरीब गरजू अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक उठाव अंतर्गत दत्तक घेतले होते. निराधार आणि गरजू मुलांचा ते स्वतः शैक्षणिक खर्च करत होते. मसुरे गावातील धार्मिक कार्यक्रमात ते नेहमी हिरारीने भाग घेत असायचे.गावातील मंदिर जीर्णोद्धार करण्यात त्यांचा मोठा वाटा असायचा. मसूरे व मुंबई येथे सामाजिक, कला, क्रीडा, नाट्य, शैक्षणिक, धार्मिक या क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अनेक रुग्णांचे त्यांनी मोफत उपचार करून जीवदान दिले होते. गावातील सर्व क्षेत्रातील गरजवंतांना मुंबईमधील हक्काचा माणूस म्हणून अण्णा परब यांच्याकडे पाहिले जात होते. मसुरे परिसरामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा भरवून गावातील तरुणांना क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.. अण्णा परब यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय असे विविध मानाचे पुरस्कार मिळाले होते.मुंबईमध्ये शिक्षण महर्षी हा मानाचा पुरस्कारही त्यांना प्रशासनाकडून प्रदान करण्यात आला होता. अण्णा परब यांचे सर्व स्तरातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा परब यांचे ते चुलत भाऊ तर बॉम्बे हॉस्पिटलचे युनियन पदाधिकारी भरत काळसेकर यांचे ते मावस भाऊ होय..

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा