मास्क लावा मालवण कोरोना मुक्त ठेवा : नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन

मालवण, दि.२३ फेब्रुवारी
मालवण शहरात पुन्हा काही प्रमाणात स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी झाला पण पूर्णपणे गेलेला नाही. शासनाने जगजीवन पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनलॉक केले पण शासनाच्या ‘अनलॉक’ धोरणाचा चुकीचा अर्थ काढल्याने पुन्हा एकदा रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली आहे. तरी कोरोना खबरदारी नियमांचे काटेकोर पालन करून कोरोना मुक्तीसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

स्थानिक नागरिक व व्यवसाईकांची रोजीरोटी काही व्यवसायावर आहे. हे व्यवसाय अखंड सुरू राहावेत, मालवण शहर कोरोनामुक्त राहावे. ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. शासनाने अनलॉक केल्यानंतर सर्व व्यवसाय आता सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. मालवणच्या पर्यटनाने उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट संपत आले असे वाटत असताना पुनः कोरोनाचे रुग्ण मिळायला सुरुवात झाली आहे.

मालवण शहरात जानेवारी पासून आता पर्यंत ३५ रुग्ण आढळून आले आहेत. मालवण मध्ये बहुतांश नागरिक मास्कचा वापर नित्यनियमाने करत आहेत. त्या बरोबर विनामस्क फिरणारे नागरिक पर्यटक यांच्याकडून दर दिवशी ४ ते ५ हजार दंडही वसूल होतो ही वस्तुस्थिती आहे.

पर्यटन वाढले पण पर्यटक ही निर्धास्त आहेत हे पण तेवढेच खर आहे. दंड हा त्यावर तात्पुरता उपाय आहे पण त्यांचे स्थानिक पातळीवर प्रबोधन होणं गरजेचे आहे.

कारण ही लढाई एकट्याची नाही तर सांघिक आहे. मालवणच्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. मास्क लावल्यावर दंड केल्यावर हुज्जत घातली जाते, पण शासनाने हे निर्बंध का आणि कोणासाठी घातले याचा विचार होणे गरजेचे आहे.

बाजरपेठेतही काहीवेळा अनावश्यक फिरणाऱ्यांची गर्दी दिसून येते. एकाच ठिकाणी अशी गर्दी न होता सोशल डिस्टन्स कसे राहील. याची काळजी प्रत्येकाने स्वतःहून घेतली पाहिजे. मास्कचा वापर प्रभावीपणे केला पाहिजे. व्यापारी वर्गाने नागरिकांना घरपोच सेवेवर काही दिवस भर द्यावा. कोरोनाने पुन्हा डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे . शासन स्तरावर सुद्धा या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून लॉक डाऊन सारखे कठोर निर्णय घ्यावे लागतील. असे सूतोवाच केले आहे.

त्यामूळे गेले वर्षभर कोरोनाचा सामना करताना झालेली आर्थिक, शारीरिक, आणि मानसिक परिस्थिती आता कुठे थोड्या प्रमाणात जागेवर येत असताना पुन्हा लॉक डाऊन सारखे निर्णय आता परवडणारे नाहीत. त्यामुळे आपल्या शहरात अशी स्थिती येऊ नये म्हणून संघटित मुकाबला करणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. यासाठी मालवण नगर परिषदेस सहकार्य करा. विना मास्क फिरणाऱ्या लोकांचे, पर्यटकाचे मास्क लावणे बाबत प्रबोधन करा. व्यापारी वर्गाने सुद्धा आपल्या व्यापारी बांधवाना पुढील काही दिवस अधिक काळजी घेण्याची विनंती करा.

सद्यस्थितीत मालवणची परिस्तिथी आटोक्यात आहे, पण ती तशीच ठेवणे आपल्या हातात आहे. अन्यथा नाईलाजास्तव
कठोर निर्णय घेणे भाग होईल. तरी या लढ्यात प्रशासनास सहकार्य करा आणि मालवण शहराची एकजूट दाखवून द्या.

दाखले घरपोच सेवा

नगरपरिषद मध्ये महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी यावे. दाखले हवे असतील तर ०२३६५२५२०३० या नंबर वर फ़ोन लावावा, घरफोच दाखले देण्याची सुविधा करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिक आणि लहान मुले यानी शक्यतो घराबहेर पडू नये. असेही आवाहन नगराध्यक्ष यांनी केले आहे.

लक्षणे असणाऱ्यांनी तपासणी करा

नागरिकांना ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास कोविड पॉझिटिव्ह या भीतीने ₹ तपासणी करण्याचे टाळू नका, माहिती लपवल्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्क मधे आलेल्या व्यक्तीनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा, प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही नगराध्यक्ष यांनी केले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा