आंगणेवाडी सजली यात्रेसाठी!

यावर्षीचा जत्रोत्सव मर्यादित स्वरूपात

घरातूनच करा आई भराडी मातेचे स्मरण

मसुरे-दि.०६ मार्च झुंजार पेडणेकर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ मार्च रोजी रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने व केवळ आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा जत्रोत्सव कोरोना बाबतचे शासनाचे निर्देश काटेकोरपणे पाळून होत आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग पोलिसांच्या बंदोबस्ताने सील करण्याचे आदेश यापूर्वीच दिल्याने कडक तपासणी नंतरच आंगणे ग्रामस्थांना सुद्धा आंगणेवाडीत प्रवेश मिळणार आहे.
कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नसल्याने गर्दी टाळण्यासाठी यावर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने व मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पाहुणे, मित्र मंडळी, यात्रेकरू, पंचक्रोशीतील ग्रामस्थ याना विनंती की, त्यांनी ६ व ७ मार्च या दोन्ही दिवशी श्री भराडी मातेच्या उत्सवात सहभागी न होता जेथे आहेत तेथूनच देवीला नमस्कार करावा व श्री भराडी देवीचा वार्षिक उत्सव आणि सर्व विधी निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.
देवालयाच्या परिसरात दर्शन रांग व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे. मंदिर परिसरात दोन वैधकीय अधीकारी, आरोग्य सेवक पथक चोवीस तास उपलब्ध असणार आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुबेर मिठारी यांनी दिली आहे. पोलीस विभागाने सुद्धा बंदोबस्त कडक केला असून जिल्हा पोलिस प्रमुख राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ अधिकारी, १९१ पोलिस अंमलदार, १ बॉम्ब नाशक पथक, १ आरसिपी पथक तैनात असणार आहे. बाहेरील भाविकांना यात्रा कालावधीमध्ये प्रवेश नसल्याने आंगणेवाडीतील प्रवेश मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी दिली आहे. जत्रोत्सव कालावधीमध्ये श्री भराडी देवालय परिसरातील स्थानिक दुकाने सुद्धा बंद राहणार असल्याने काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. सुमारे दीड ते दोन किमी परिसरात भरणारी ही जत्रा यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात भरत असल्याने यात्रेचा फील अभावानेच येत आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा