पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे घेतील तो निर्णय मान्य ; युती किंवा स्वबळावर लढण्यास आम्ही सज्ज
कणकवली दि.३१ ऑक्टोंबर
महाराष्ट्र राज्यात महायुती आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची निवडणुक भाजपने स्वबळावर लढण्याचे अद्यापही आदेश आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या कि नाही याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे घेतील. जो काही निर्णय ही मंडळी घेतील, त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते निवडणुका लढवतील, कणकवलीत सगळे विरुद्ध आम्ही असे लढायची सवय असा टोला विरोधकांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.
कणकवली नगरपंचायतीच्या आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही विरुद्ध सर्वजण अशाप्रकारे झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत आम्ही विरुद्ध सर्वजण अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर निवडणुक लढविण्यासाठी सज्ज आहोत. भाजपच्या विरोधात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे गेले तरी हे आव्हान पेलवून न. पं. भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही तयार आहोत. निवडणुकीमध्ये जशी परिस्थिती निर्माण होईल, तसं निर्णय होतील. न. पं. ची निवडणूक लढविण्यासाठी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी आमची सर्व टीम सज्ज आहे. कारण मागील पाच वर्षांत शहरात भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या जोरावर आम्ही कणकवली शहरवासीयांना आम्हाला पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन करत आहोत, असे समीर नलावडे यांनी सांगितले.


