जुगार अड्डयावर छापा टाकण्याची नौटंकी करतात फक्त हप्त्याची रक्कम पाच पटीने वाढली-माजी खासदार विनायक राऊत
मालवण,दि.३१ ऑक्टोबर
वादळी व अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळी सुट्टीत येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे, मासेमारी बंद झाली आहे. पावसाने कोकणातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे सरकार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करते, मात्र कोकणातील भातशेती उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाही. अवकाळी पावसामुळे मासेमारी व्यवसाय बंद झाला असून मच्छिमारांसाठी सरकारने काय केले. मागच्या वादळात सरकारने मच्छिमारांना तुटपुंजी मदत दिली. सरकार कडून मच्छिमारांची थट्टा केली जात असून कोकणातील लोक अशा सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवतील असा ठाम विश्वास माजी खासदार श्री. विनायक राऊत यांनी येथे बोलताना व्यक्त केला हा विश्वास व्यक्त करतानाच श्री राऊत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले जुगार अड्डयावर छापा टाकण्याची नौटंकी करतात, कारवाईचे काम पोलिसांनी केले पाहिजे, काही दिवसानंतर पून्हा अड्डे सुरु झाले असून फक्त हप्त्याची रक्कम पाच पटीने वाढली असा घणाघात श्री. राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला
ठाकरे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथील हॉटेल चैतन्य मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालूकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, महिला तालुकाप्रमुख दिपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, काँग्रेसचे तालूकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, नरेश हुले, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, लुडबे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना विनायक राऊत म्हणाले, मागच्या निवडणुकीत दुर्दैवाने जनतेने भ्रष्टाचारी लोकांच्या हातात जिल्हा दिला, मात्र ही चूक जनतेने पुन्हा करू नये, जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी म्हणून ताकदीने निवडणुका लढवून त्या जिंकू देखील हा आमचा आत्मविश्वास आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी शिल्लक राहणारं नाही असे म्हणणाऱ्यांना जिल्ह्यात आघाडी किती मजबूत आहे हे दाखवून देऊ, असे आव्हान माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत देतानाच सिंधुरत्न योजनेत सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत लवकरच त्याचा पर्दाफाश करू, असा इशाराही दिला. ते पुढे म्हणाले,
ड्रग्जचा अड्डा म्हणजे सिंधुदुर्ग अशी जिल्ह्याची ख्याती झाली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जिल्ह्यात येत असून यासाठी शाळकरी मुलांचा वापर केला जातोय असा आरोपही त्यांनी केला
पालकमंत्री स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी रो रो बोट सेवा आणल्याचे दाखवत आहेत. भीक नको पण कुत्रा आवर अशी रो रो बोट सेवेची अवस्था आहे. मात्र महामार्गची दुरावस्था झाली असून त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. जे पालकमंत्री जिल्हा केंद्रातील रस्ते व्यवस्थित करू शकत नाही त्यांनी त्यांना जिल्ह्याच्या विकासावर बोलण्याचा अधिकार नाही अशी टिकाही राऊत यांनी केली.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम्हाला
कोणाला आव्हान देण्याची गरज नाही. जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांच्चा विचाराने निवडणुका लढवाव्यात या विचाराचे आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवू, यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत. काहीजण कोकलत आहेत की जिल्ह्यात महाविकास आघाडी शिल्लक राहणारं नाही त्यांना आम्ही चष्मा देण्याचे ठरविले आहे. तो चष्मा लावून जिल्ह्यात आघाडी कीती मजबूत आहे ते पाहावे. आम्ही एकजुटीने, एक विचाराने निवडणुकीत उतरून निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास आहे.
आमचं राजकारण व समाजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर आणि संस्कृतीला धरून आहे. सत्ताधाऱ्यांसारखें त्याला बाजारु स्वरूप आमचे नाही. आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यात कौरव – पांडवासारखं युद्ध सुरु आहे, तशा प्रकारचे स्वार्थी आणि पैशाच्या जोरावर आमचे राजकारण नाही, असेही श्री. राऊत म्हणाले.
तौक्ते वादळ वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याठिकाणी पाहणीसाठी आले असता भूमिगत वीज लाईन टाकण्याची मागणी आम्ही केली होती. यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुंबईत बैठक घेऊन कोकण किनारपट्टीवर भूमिगत वीज लाईन टाकण्याचे ठरवून तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे ३,७६० कोटींचा प्रस्ताव पाठविला. त्यासाठी केंद्राकडे आपण खासदार म्हणून तसेच तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला. त्यावेळी पाहिल्या टप्प्यात १७६० कोटी निधी मंजूर होऊन आज कोकण किनारपट्टीवर भूमिगत वीज लाईन टाकली जात आहे, हे केवळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तत्परतेमुळे आणि कोकण वासियांबद्दल असलेल्या आत्मीयतेमुळे शक्य झाले असेही श्री. राऊत म्हणाले.
मालवण नगरपालिका क्षेत्रात झालेल्या बोगस कामांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. भुयारी गटार योजना, खड्डे बुजविणे अशा कामांच्या माध्यमातून पैसा उकळला गेला असून त्याबाबतीत आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठवीला आहे. मालवणसाठी राजकारण विरहित समाजकारण करणे गरजेचे आहे, मात्र दुर्दैवाने आताचे निवडून आलेले सत्ताधारी एकमेकांच्या उरावर बसण्याचे काम करत आहेत, लोकांच्या हिताचे काम कोणीही करत नाही, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तसेच मालवण शहरातील जनतेला त्रासदायक ठरणारा शहराचा विकास आराखडा रद्द करण्यासाठी आम्ही यापूर्वी प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. तरी आम्ही हा विषय सोडलेला नाही. विकास आराखडा अंमलात येऊ देणार नाही, मालवण नगरपालिकेच्या गत निवडणुकीप्रमाणे आताच्या निवडणुकीतही शहर विकास आराखडा हा निवडणुकीचा मुद्दा राहील, असेही श्री. राऊत म्हणाले.
आमच्या अथक प्रयत्नातून सिंधुरत्न योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत भरघोस निधी दिला होता. मात्र, आताच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेत साडेचारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा दोन्हीही जिल्ह्यात झालेला आहे, याचा पर्दाफाश आम्ही करू तसेच या योजनेचा वापर सत्ताधाऱ्यांकडून स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर केला हे दाखवून देऊ, असेही श्री. राऊत शेवटी म्हणाले.


