जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कणकवलीचा गौतम यादव अजिंक्य !

सावंतवाडी,दि.१२ मार्च
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची ५ वी वरिष्ठ जिल्हा कॅरम अजिंक्यपद आणि आंतर क्लब स्पर्धा, इंडियन ऑईल कप २०२३-२४ सावंतवाडी जिमखाना कॅरम विभाग येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये बांदा, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, देवगड इत्यादी ठिकाणच्या ५२ स्पर्धकांनी खुल्या एकेरी गटामधे तर ६ संघांनी सांघिक गटामधे सहभाग घेतला.
वैयक्तीक खुल्या गटामधे गौतम यादव, कणकवली, रामा गावडे, अमुल्य घाडी, सचिन घाडी, प्रतिक बांदेकर, केशर निर्गुण सर्व सावंतवाडी, अमेय पेडणेकर, कुडाळ व संदिप राणे, देवगड यांनी उपउपान्त्य फेरीत प्रवेश केला.तर अमुल्य विरुद्ध गौतम आणि सचिन विरुद्ध रामा अशा उपान्त्य लढती सरळ दोन गेम मधेच संपल्या.
अंतिम सामन्यात कणकवलीच्या गौतमने रंगतदार दोन सेटस् मधे सावंतवाडीच्या रामा वर विजय मिळवत इंडियन ऑईल कपवर आपले नाव कोरले.आकर्षक ट्रॉफीज् व रोख रकेमेची पारितोषिके विजेत्यांना देण्यात आली. या प्रसंगी जिल्हा असो.चे उपाध्यक्ष श्री. सुनिल धुरी, योगेश फणसळकर, राजेश निर्गुण अमोल खानोलकर, पांडुरंग पाताडे व सचिन घाडी इत्यादी उपस्थित होते.